सत्य... हा केवळ एक भास आहे. पटत नाही ना? पण हेच सत्य आहे. जगातलं शाश्वत किंवा त्रिकालाबाधित सत्य कोणतं, असं विचारलं तर त्याचं उत्तर कोणीही देऊ शकणार नाही. स्वतः काळही नाही. सत्य अबाधित असू शकत नाही. त्याला नेहमी अपवाद असतात जे त्याच्या अखंडपणाला बाधा आणत असतात.
सत्य खरंच एक भास आहे. एखादी गोष्ट ‘पूर्ण सत्य’आहे असे कुणी छातीठोकपणे सांगू शकेल का? आपल्याला गोष्टी एकाच बाजूने दिसतात आणि मग त्याच आपण ‘पूर्ण सत्य’ मानून चालतो. सत्य नाण्याच्या दोन बाजूंसारखं दोन भागांत विभागलेलं असतं
- एक, जे आपल्याला दिसतं; दुसरं, जे त्यामागे असतं. म्हणजे जे आपल्याला माहीत झालेलं असतं ते ‘अर्ध’सत्य असतं आणि तरीही लोक ‘मला पूर्ण सत्य माहीत आहे’ चा दावा करतात बिनधास्त.
नाण्याच्या दोन्ही बाजू एकदम कधीच बघता येत नाहीत. एक बघावी तर दुसरीने पाठ फिरवलेली. हां, आरशासमोर उभे राहिलात तर एकाचवेळी दोन्ही बाजू बघता येतील. पण हे ही लक्षात ठेवायला हवं की त्या नाण्याबरोबर आपणही दिसत असतो आपल्याला त्या आरशात, अगदी जस्से आहोत तस्सेच. नाण्याच्या दोन्ही बाजू बघता येतील, कळतील आणि पचतीलही कदाचित, पण मग त्याचवेळी त्याबरोबर दिसणारं स्वतःचं सत्य बघायची, कळायची आणि पचवायची हिंमत आहे का आपल्यात?
कुठलीच बाजू बघायला लागू नये म्हणून नाणं उभंच करून ठेवायचं, असाही प्रकार करतात काही लोक. पण सत्याकडे असा कानाडोळा केला म्हणजे ते अस्तित्वातच नाही असं होत नाही. ते उभं नाणं
पडतं कधीतरी आणि त्याची एकतरी बाजू समोर येतेच, तुमची इच्छा असो वा नसो.
सत्य ही काळाबरोबर बदलणारी गोष्ट आहे. सूर्य व इतर ग्रह पृथ्वीभोवती फिरतात, हे सत्य शतकानुशतकं चालत आलं. लोकांनी या गोष्टीला सत्य मानून त्यावर विश्वास ठेवला. पण जेव्हा पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात, पृथ्वीभोवती नाही ही गोष्ट जेव्हा सिद्ध केली गेली तेव्हा जगाने हळूहळू त्याला सत्य
मानायला सुरुवात केली. उद्या कदाचित अजून एखादा नवा शोध लागेल आणि प्रस्थापित सत्याला धक्का लागून त्याची जागा नवं सत्य घेईल. काय सांगावं!
‘माणसं देवानं निर्माण केली’ हे सत्य कालानुरुप बदलून ‘माणसं माकडांपासून उत्क्रांत झाली’ ही नवी ‘बाब’ समोर आली आणि मग ते सत्य बदलून असत्य झालं आणि ती बाब आता सत्य म्हणून स्वीकारली गेली आहे. काळाच्या पोटातून अजून काही सत्यं
बाहेर पडत जातील आणि प्रस्थापित सत्यं इतिहासजमा होतील किंवा विस्मृतीत जातील. कालाय तस्मै नमः!
मरणाइतकं शाश्वत आणि भयावह सत्य जगात अन्य कोणतंही नाही. किंबहुना ते शाश्वत आहे म्हणूनच लोकांना ते पटकन पचनी पडत नाही. शेवटी काय, ‘मानला तर देव, नाहीतर दगड’, त्याप्रमाणं ‘मानलं तर सत्य, नाहीतर असत्य’ असाच प्रकार आहे.
Comments
Post a Comment