अशीच पावसाळी दुपार
समोर कागद-पेन
अर्धवट सुचलेली वाक्यं
बाहेर पिरपिर सुरू
आत मळभ दाटलेलं
बाहेर आभाळ रितं होत राहतं
इथं भरून आलेलं मन
मध्येच एखादी सर येते
‘खिडकी लावावी का?’
‘नको, सुचेलंच इतक्यात काहीतरी’
सर पडून गेली तरी कोरा राहिलेला कागद
तुषार उडत राहतात कागदावर
आणि मनावरही
बाहेर वारा मनमौजी
आत उगीचच विचारांची भेंडोळी उडत राहतात
‘पावसावर लिहावं का?’
‘जुना झाला विषय’
‘मग संध्याकाळी भाजी आणावी
की कापावा नवर्याचा खिसा
आठ दुणे सोळा तुकड्यांत?’
कालच TV वर पाहिलेल्या
‘ती सध्या...’ च्या धर्तीवर
‘तो सध्या...’ चा चुकार विचार
“कॉफी करतेस का गं थोडी?”
नवर्याचा आळसावलेला स्वर
उत्तर देण्यापूर्वीच किचनमध्ये
भांड्यांचा आवाज
अजूनही बाहेर पाऊस
आणि समोर कागद कोरा
‘ठक्’ टेबलवर दोन मग्स्
“म्हटलं आज जरा तुला डिस्टर्ब करावं”
विस्कटलेले केस, डोळ्यांत अर्धवट झोप
आणि थकलेल्या चेहर्यावर मिस्कील हास्य
-कायांप्रि
Comments
Post a Comment