मनात शिरकाव केला तिनं तो दिवस कधीच विसरू शकणार नाही मी. आतून बाहेरून हादरून गेले होते मी. तिची कंपनं शरीरभर तरंगत राहिली होती. अजूनही परत येतात ती कधीकधी. मी बेसावध असताना. हळूहळू बांधत नेलेल्या धैर्याच्या भिंतीला ओरखडे उठतात त्या कंपनांनी. तडे जात राहतात मग तिला.
आज परत आली ती पुन्हा. धक्के देत देत ती मला माझ्या अस्वस्थतेच्या सीमारेषेकडे घेऊन गेली आणि एका अस्थिर निमिषार्धात ढकलून दिलं तिनं मला त्या रेषेपलीकडे.
भेलकांडत एका नव्या काळोखात जाऊन पडले मी. तिचंच भयंकर रूप होतं ते. जितकं शांत, तितकंच अंगावर येणारं. आधारासाठी भिंत शोधत होते मी. आसपास काहीच नव्हतं ज्याचा आधार घेऊन उभी राहू शकेन. पण हवेत हात चाचपडत होते तेव्हा सतत हाताला काहीतरी बिलगू पहात होतं. त्या अवस्थेतही हात पुढे केला मी. आशेनं? कुतुहलानं? काहीतरी आकारविहीन माझ्या त्या हाताला गिळू पहात होतं.
त्याची थंड शिरशिरी नसानसांतून वहात गेली आणि मिटून घेतलं मी जमिनीवर स्वतःला. काहीतरी टोचत होतं, वळवळत होतं अंगाखाली. चाचपडून बघावं इतकंही त्राण नव्हतं अंगात.
हळूहळू ती वळवळ वाढली. शरीराची गात्रं अस्वस्थ होऊ लागली. उठावंसं वाटत होतं पण शक्तीनं बहिष्कार घातला होता आणि लपून बसली होती ती कुठेतरी. कशाचाच अंदाज येत नव्हता.
अचानक काहीतरी बदललं.
सगळं शांत झालं काही क्षणांसाठी. स्तब्ध. श्वाससुद्धा.
काहीतरी जाणवायला लागलं. लक्षात यायला लागलं.
पण खूप उशीर झाला होता तोपर्यंत. ती त्वचेला रुतणारी जमीन आत हाडांपर्यंत जाऊन पोचली होती. वरून ती आकारहीन गोष्ट माझं ते मुटकुळं गिळंकृत करू पहात होती. दबाव वाढत चालला होता. शरीराची हालचाल होत नव्हती. कुणी बांधून घातलं नव्हतं पण बंधन जाणवत होतं. क्षणाक्षणाला आवळत होतं ते. त्या दबावाने आक्रंदन वाढत चाललं होतं. जीवाची घुसमट होत होती. श्वासांचे हिंदोळे हलले आणि त्यांच्या स्पंदनांना धक्का लागला. शरीराच्या गात्रांना धडका देत जागं करणारं हृदय काही क्षण धडधडलं, मंदावून निपचित पडलं.
आणि शांत झालं सगळं.
ती आणि तिचा अतीव ओतीव गारठा तेवढा पुरून उरला. थकून जाण्याइतकेही प्राण न उरलेल्या माझ्याकडे ती स्तब्धपणे निर्मोहाने बघत उभी राहिली.
निर्मोहाने??
नि..र्मो..हा..ने...?
कसल्याशा आघाताने पटकन डोळे उघडले मी. भगभगीत प्रकाश डोळ्यांच्या बुबुळांतून पार आरपार जाऊन मेंदूवर आदळला. कोपरा न् कोपरा लख्ख उजळून निघाला. हृदयाची धडधड कानांच्या पडद्यांवर थपडा देऊ लागली. श्वासोच्छवासाने चेहरा गरम झाला.
कशाने जाग आली? तिच्या निर्मोही नजरेने. पुन्हा एक अस्वस्थ सावट पसरलं मनावर. म्हणजे? तिला थांबायचं नव्हतं का? मग का छळत राहिली ती आयुष्यभर मला? का होती ती तिथे सतत?
मी तिला कधी जाऊच दिलं नाही म्हणून.
त्या सावटाला एक हादरा बसला.
मी तिला मनात येऊ दिलं म्हणून ती आली. मी तिला जाऊ दिलं नाही म्हणून ती राहिली. पण मग मी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. स्वतःचा अहंकार जपण्यासाठी. मी खंबीर आहे हे ‘दाखवण्यासाठी’. स्वतःचा घाबरटपणा लपवण्यासाठी.
रेषेपलीकडचं अस्तित्व तिचं नव्हतं. ते माझ्या नेभळटपणाचं होतं. माझ्या दुर्लक्षित करण्याच्या स्वभावाला ढकललं होतं तिनं सीमेपलीकडे. तिच्या निर्मोही नजरेनं माझ्या खोटेपणाला डिवचलं म्हणून अस्वस्थ झाले होते मी. कारण तिनं आरपार पाहिलं होतं माझ्यात.
सावट सरलं.
तिच्या त्या नजरेनं डोळे उघडले होते माझे. कायमचे...
-कायांप्रि
Comments
Post a Comment