कधी कधी कंटाळा येतो. मग खूप कंटाळा येतो. मग इतका कंटाळा येतो की कंटाळा यायचासुद्धा
कंटाळा येतो.
अशावेळी काहीतरी लिहावंसं वाटतं. पण उठून पेन-कागद घ्यायचा कंटाळा येतो. मग विचारांची
भेंडोळी सोडवत बसते मी मनातल्या मनात.
त्या भेंडोळ्यांमध्ये सापडतात अनेक विचार, माणसं, प्रसंग, गोष्टी, आठवणी आणि बरंच काही.
बरंच काही जे त्या भेंडोळ्यांमध्ये कायमचं हरवून जावंसं वाटतं. बरंच काही जे कधीच कुणाला कळू नये असं वाटतं. बरंच काही जे पुन्हा कधी नजरेला पडू नये असं वाटतं. असं बरंच काही आहे जे बऱ्याचदा वाटतं.
पण कितीही वाटलं तरी मन कुठे ऐकतं?
ते पुन्हा शिरतं त्या भेंडोळ्यांच्या गुंतागुंतीत. मन गुंतवायचा
तसा हा एक चांगला मार्ग आहे. पण गुंतण्याऐवजी कधी कधी नुसतीच गुंतागुंत वाढत राहते. त्या गुंत्याची गर्दी वाढत जाते. आजूबाजूला पसारा वाढत जातो आणि मग तो पसारा आवरायचा जाम कंटाळा येतो.
मग तो पसारा तसाच टाकून उठते मी. मन तर शांत झालेलंच नसतं. पण आता पोटही अशांतीचा मार्ग पत्करतं. उठून किचनमध्ये जाते मी. ओट्यावरचा
पसारा तसाच बाजूला लोटून देते. पण काही करून खायचा भयानक कंटाळा आलेला असतो.
'मागवूया का काहीतरी ऑनलाईन?' मग टोमॅटो नाहीतर चीगीवीगी सारख्या ऍप्स वर नवीन नवीन डिशेस डोळ्यांसमोर रुंजी घालायला लागतात. 'हे मागवूया',
'नको, तेवढं पुरणार नाही', 'मग हे पण ऑर्डर करायचं का?' असं करत करत २-३ चटपटीत गोष्टी 'ऑर्डर मेनू' मध्ये ऍड होतात.
अंगावर चढलेला कंटाळा कधीचाच कंटाळून सोफ्यावर अंग टाकून पसरलेला दिसतो. त्याला थोडंसं उत्साहाने
बाजूला ढकलून मीही पसरते त्या सोफ्यावर,
अजून एखादा मेनू ऍड करायच्या उद्देशाने.
बऱ्याच वेळाने तो मेनू फायनल होतो. उत्साहाने मी 'ऑर्डर नाऊ'च्या बटनावर क्लिक करते.
पेमेंट करायच्या वेळी लक्षात येतं...
.
.
.
.
.
.
.
की हा महिन्याचा
शेवटचा आठवडा आहे आणि माझ्या अकाऊंटमधले
पैसे कंटाळून आधीच अकाऊंट सोडून निघून गेले आहेत.
कंटाळून मी मोबाईल ठेवून देते. शेजारी पसरलेल्या
कंटाळ्याला तसाच तिथे टाकून किचनमध्ये जाते. कोपऱ्यातल्या डब्याच्या
तळाशी मॅगीचं एक पाकीट कसनुसं पडलेलं असतं. सगळा कंटाळा झटकून मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवते…
- कायांप्रि
Comments
Post a Comment