सगळ्यांनाच एक इच्छा नेहमी असते- limelight मध्ये येण्याची! कारण माणसावर जेव्हा लाइमलाइटचा फोकस पडतो तेव्हा फक्त तो माणूस दिसत असतो...
…आणि आजूबाजूला असतो अनंत अंधार. आणि त्या अंधारातून येणारे टाळांचे कडकडाट, कौतुक. लाइमलाइटमध्ये उभ्या असणाऱ्या माणसाला आपण एकदम larger than life असल्याचा आभास निर्माण करणारं वातावरण.
स्वप्नांच्या रथात स्वार होऊन सर्वांकडून कौतुकसोहळे स्वीकारणं... हा स्वप्नांचा रथ नेहमीच जमिनीपासून दोन बोटं वरती चालतो आणि मग स्वर्ग फक्त दोन बोटं उरल्याचा भास.
लाइमलाइटमधली व्यक्ती नेहमी तिथंच राहण्यासाठी धडपड करते. तो फोकस आपल्यावरून जराजरी हलतोय असं फक्त वाटण्यानेही अस्वस्थ व्हायला लागतो. तिथं राहण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतो. स्वत:च्या कौतुकसोहळ्याच्या ऐन भरात तो लाइमलाइट झुगारून द्यायला आपला असा जात्याच माज असावा लागतो. तो प्रत्येकात असेलच असं नाही. अशावेळी जेव्हा त्या लाइमलाइटचा फोकस हलतो तेव्हा तो आपल्यावरून हलला यापेक्षा तो दुसऱ्या कुणावर तरी स्थिरावू पाहतोय याचं दु:ख आणि पर्यायाने बोच जास्त असते. लाइमलाइटबाहेरच्या अंधारापेक्षा माणूस मग स्वत:च्याच मनातून उत्सर्जित होणाऱ्या निराशेच्या अंधारात बुडायला लागतो.
लाइमलाइटशिवायचा अंधार... फक्त अंधार! आणि अंधारच फक्त! त्या अंधारात दिसत काहीच नाही. ऐकू येतात ते केवळ टाळ्यांचे कडकडाट. हा कडकडाट लाइमलाइटमध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीसाठी फार महत्वाचा असतो. कारण हाच अनंत पोकळीतून येणारा आवाज त्याचं लाइमलाइटमधलं अस्तित्व अधोरेखित करत असतो, तो लाइमलाइट नाही.
लाइमलाइटमध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीकडे बघून कळतं की तिथं उभं असल्याचा फील काय असतो ते. तो उजेड आकर्षित करत राहतो आपल्याला, प्रत्येकाला. अंधारात मिणमिणत्या पणतीकडे पतंग आकर्षित होत राहतो तसा. त्या आकर्षणापायी जीव ओवाळून टाकणं इथंही आहे आणि तिथंही. फरक इतकाच आहे की इथं मरण फार पटकन येतं, थोड्याशा वेदनांसहित. तरीही सार्थ. जगण्याचा उद्देश सफल करणारं.
आणि त्या अंधाराचं काय? तो काय फक्त उजेडाचं अस्तित्व टिकवून ठेवायला आहे? टाळ्यांच्या आवाजांची आवर्तनांवर आवर्तनं उमटवण्यासाठी आहे? लाइमलाइट कुणावर तरी येऊन स्थिरावतो. त्या व्यक्तीचा भूतकाळ, काही काळ का होईना, विरघळून जायला लागतो त्या मिट्ट काळोखात. मग ज्यांच्या वाटेला तो आला नाही त्यांची असूया, धक्का, घुसमट, निराशा आणि मग हतबलता यांच्या धुरात त्यांच्या स्वत:च्याच आशेचे श्वास गुदमरतात. हुंदके श्वासांत घुसमटत राहतात. हळूहळू श्वास त्या धुराने कोंडतोय की अडकलेल्या हुंदक्यांनी हेच कळत नाही. त्या धुराने अंधार अजून काळोखत जातो आणि कितीतरी दृश्य-अदृश्य, असलेल्या-नसलेल्या गोष्टी आपल्यात सामावून घ्यायला लागतो अजूनच. सगळं याच अंधारात. लाइमलाइटमध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीबद्दलचा जळफळाट टाळ्यांच्या कडकडाटात शमवावा लागल्याने येणारी उद्विग्नता. भणंगता. दुभंगलेपण. याच अंधारात. लाइमलाइटमध्ये येण्यासाठी त्याने ‘काय काय’ केलं याची अस्वस्थ कुजबूजही मग...
एखादा माणूस लाइमलाइटमध्ये येतो तेव्हा त्याचं सगळ्यांत आधी लक्ष जातं ते त्याच्या डोक्यावरच्या फोकसकडे. त्या उजेडात दिपून जातात डोळे. आजूबाजूच्या उत्फुल्ल कौतुकानं कान तृप्त तृप्त होतात. अलगद डोळे मिटले जातात सुखसहवासाने. तरीही त्या लाइमलाइटची ऊब जाणवतेच पापण्यांना. सुखद अनुभव. मन रचायला लागतं मग स्वप्नांचे इमले. आणि तो स्वप्नांचा रथ उडायला लागतो हळूहळू हवेत उंचच उंच. उंच उंच उंच... अजून उंच. नजर पोहोचेल तिथंपर्यंत उंच... मन पोहोचेल त्याही पलीकडे उंच... कल्पनेपलीकडेही उंच.....
...................................................आणि तितक्याच वेगाने जेव्हा तो जमिनीवर आदळतो........................................................................................
खाडकन् डोळे उघडतात अणि भिंतीला भगदाड पडून पुराचं पाणी जसं घरात घुसावं तसा सगळ्यांत आधी डोळ्यांत शिरतो तो अंधार. टोचायलाच लागतो डोळ्यांना. धक्क, नकळतेपण, अपेक्षाभंग, भीती, शहारा, छाती दडपून जाणं, श्वास कोंडल्यासारखं होणं, मन अस्वस्थ होणं, भान हरपणं... आणि अजून बरंच काही जे शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही. आसपासचा अंधार आता दशदिशांनी आपल्या असंख्य हातांनी मिठीत घ्यायला बघतो. भावनांचे कल्लोळ दाटत राहतात, विरेविरेपर्यंत पुन्हा पुन्हा दाटतात. ज्या अंधारातून उभारी घेतली तोच अंधार पायात दलदल बनून रुतवायला लागतो जमिनीत. पळून जायला दिशा दिसत नाही. मदतीला हाक मारावी तर घशातून शब्द फुटत नाही. आणि मग हाक मारली तरी येणार कोण हाही प्रश्न असतोच. कारण उन्मादात त्या व्यक्तीने एकट्यानेच कितीतरी उंच भराऱ्या मारलेल्या असतात कल्पनेच्या आकाशात. जिथे तो इतका वेळ एकटाच असतो आणि त्या एकटेपणाचा हव्यास त्यानेच जडवून घेतलेला असतो तिथे. अतिउंच उडू नये म्हणून जमिनीशी बांधून ठेवणारे हात झिडकारून टाकलेले असतात केव्हाच. ‘सावध’ म्हणणाऱ्या तोंडांपासून तोंड फिरवून घेतलेलं असतं. ‘आपलं’ म्हणावं असं कुणी रहात नाही... आणि अशावेळी तो अंधार त्याला गिळंकृत करायला वाऱ्याच्या वेगाने सरकत असतो त्याच्याकडे. धरणी फाटावी आणि तिने आपल्याला गपकन् पोटात सामावून असं खूप वाटून जातं. पण असं काहीच होत नाही आणि त्या अंधारात तो बुडून जातो. अगदी खोलवर.
हळूहळू भान येईल तसं लक्षात येतं की हा अंधार तर नेहमीच आसपास होता. सदैव सावलीसारखा. पण आपल्याला स्वत:त गडप करणारा तो हा अंधार नव्हे. तो होता आपल्याच मनातला अंधारा कोपरा जो हळूहळू मन व्यापत गेला आणि सगळं मनच या अंधाराने भरून गेलं तेव्हा तो जाणवला आपल्याला. हो, दिसला नाही; जाणवला. तो जाणवला नसांनसांतून, गात्रांगात्रांतून, श्वासांश्वासांतून, रंध्रांरंध्रांतून... असुरक्षितता, अविश्वास, एकटेपणाचा अंधार...
- कायांप्रि
Comments
Post a Comment