माणसाचं आयुष्य गाण्यासारखं असलं पाहिजे. ते गाणं कुणीतरी लिहितं, त्याला दुसरं कुणीतरी compose करतं, गातं कुणीतरी तिसरंच. तसंच माणसाचं पण असतं ना! म्हणजे आई-वडील दोघे मिळून जन्माला घालतात. मग त्याच्यावर वेगवेगळे लोक संस्कार करतात- आजी-आजोबा, नातेवाईक, समाज, परिस्थिती आणि त्याचं स्वतःचं मन. तसं गाण्याचं पण असतं ना. ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला समजतं. एकच गाणं आपण एका परिस्थितीत ऐकलं तर दुसऱ्या वेळी त्याचा तोच mood असेल असं नाही. आपल्याला त्याचे वेगवेगळे अर्थ लागायला लागतात त्यावेळी. जुनी गाणी... बरं जुनी जाऊ देत. आताची, आपल्या काळातली गाणी आपण ऐकतो. आज release झालं, आज ऐकलं. उद्या ऐकलं. परवा ऐकलं. महिना-दोन महिने ऐकतोय आपण. त्यानंतर दोन-तीन वर्षांनी ते पुन्हा ऐकायचं. त्या गाण्याचे संदर्भ बदललेले असतात. म्हणजे आपल्या लक्षात असतं साधारणपणे एखादं गाणं ऐकल्यावर आपल्याला काय वाटतं किंवा त्याचे भाव आपल्याला कशा पद्धतीनं समजतात. दोन-तीन वर्षांनंतर आपल्याला वाटतं, की हो, अरे हे त्यावेळी वेगळं होतं गाणं. आता वेगळं वाटतंय. असं का आहे.....? बऱ्याचदा नंतर ती गाणी फार आपलीशी वाटायला लागतात.
माणसाचं पण तसंच.पहिल्या भेटीत माणूस कळेलच असं नाही. किंवा असंही आहे की पहिल्या भेटीत तो एकदमच आवडून जातो. पण नंतर ‘अतिपरिचयात अवज्ञा’ म्हणतात तसं कंटाळाही येतो. किंवा आधी म्हटलं तसं, पटकन कळत नाही एखादं गाणं. नाही लक्षात येत त्याचं सौंदर्य. खूपच साधं वाटतं ते. म्हणजे “त्याचं composingच चांगलं नाहीये, music खूपच ‘सुमार’ आहे, शब्द ‘ठीक’ आहेत, आवाज ‘बरा’लागलाय...” पण नंतर अचानक कधीतरी ते गाणं ऐकतो आपण, आणि आपल्याला ते किती वेगळं वाटतं! “अरे आधी ऐकलं तेव्हा तर ते इतकं चांगलं वाटलं नव्हतं.” माणसांचं पण तसंच आहे. पहिल्या भेटीत कळत नाहीत. कधीतरी वाटतं की आपण चुकलो का या माणसाला समजून घ्यायला.....?
आणि अजून एक गोष्ट असते. माणसं गाण्यांसारखी असतात असं जे मला वाटतं ना......
त्याचं असं आहे की आपलं आवडतं गाणं आपण गुणगुणतो. ते दुसऱ्याचं creation आहे हे माहीत असूनही आपण ते गुणगुणतो. ते आपल्या मनात असतं. आपल्या ओठांवर आलं तरी ते ‘आपलं’ असं कधीच नसतं. ओठांतून शब्द बाहेर पडले की पडले. ते परत घेता येत नाहीत. ते ओठांवर येतात आणि निघून जातात. पण म्हणून ते पुढच्या वेळी आपल्याला आठवत नाहीत किंवा ते आवडत नाहीत असं नाही. आपण पुढच्या वेळीही ते गुणगुणतो. पुन्हा ते शब्द निसटतात. त्यानंतरही आपण ते गुणगुणतोच. जितक्या चटकन गाणं डोक्यात येतं तितक्याच पटकन ते ओठांतून निसटूनही जातं. आपण त्या गाण्यावर इतकं प्रेम करतो, आपल्याला माहीत असतं ते शब्द आपण पकडून ठेवू शकत नाही. मनातल्या मनात म्हटलं तर वाटतं, कुठे जातील आता शब्द... पण नाही. ते दुसऱ्याचं असतं ना, ते आपलं नाही होऊ शकत. किंवा जरी आपण ते मोठ्याने म्हटलं तरी आपल्याला या गोष्टीचं वाईट वाटत नाही की ते निसटून चाललंय. जेव्हा ते गाणं आपल्या ओठांवर येतं तेव्हा आपण ते enjoy करतो. ‘आज ते माझ्या ओठांवर आलं. ते माझ्या मनात होतं. आज मी ते म्हटलं...’
काही माणसांचं पण ना, असंच असतं. किमान ज्या व्यक्ती आपल्याला आवडतात त्यांच्या बाबतीत तरी हा नियम आपण पाळायला हवा. जशी आपली आवडती गाणी असतात, तशा आपल्या आवडत्या व्यक्ती असतात. जशी आवडती गाणी आपण धरून नाही ठेवत, त्यांच्यावर आपला हक्क नाही सांगत, तसं आवडत्या माणसांबद्दलही करायला हवं ना. कसं आहे, एखादं चांगलं गाणं जसं आपल्याला आवडतं, तसं ते दुसऱ्या कुणाला तरी पण आवडत असतं. कारण ते चांगलं असतं. (किमान आपल्याला तरी तसंच वाटतं!) आपल्याला आवडतं म्हणून आपल्यापुरतं मर्यादित नाही ठेवत ते आपण. तसंच आपल्या आयुष्यातल्या चांगल्या माणसांचं करायला हवं. हक्क नाही सांगायचा त्यांच्यावर. त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणं राहू आणि वाहू द्यायला हवं. मग प्रत्येकवेळी आपण त्यांना भेटू तेव्हा ते कुणीतरी नवीन असतील, आपल्याला नवीन रुपात भेटतील... जर आपण त्यांना धरून ठेवलं नाही तरच!
In fact, माणसाला स्वतःलाही गाण्यासारखं बनता यायला हवं. दुसऱ्यांच्या ओठांवर राहता यायला हवं. तसंच अगदी त्यांच्या मनातही. मग ती व्यक्ती आपल्यावर अधिकार नाही सांगणार. आपल्याला जखडून नाही ठेवणार. ती मग आपल्यालाही आपल्या तालांप्रमाणे, आपल्या सुरांप्रमाणे वाहू देईल.
प्रत्येक गाण्याचा आपला एक बाज असतो. आपला एक सूर, आपला असा ताल, आपली स्वतःची लय असते. माणसांचंही तसंच असतं. काहींना आपण नाकारतो, काहींना स्वीकारतो. अर्थात, कुणाला स्वीकारावं, कुणाला नाकारावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आता या क्षणी एखादी व्यक्ती आपल्याला वाईट दिसली, वाईट वाटली किंवा नाही पटली, म्हणून त्या एका भेटीतच त्या व्यक्तीला कायमचं नाकारणं ही चूक नसू शकते का? कारण कदाचित त्या व्यक्तीकडे त्यावेळी तसं वागण्याचं काही कारण असू शकतं. कदाचित ती व्यक्ती पुढच्या भेटीत आपल्याला चांगली वाटू शकते. पण त्यामुळे ही टोचणीही मनाला लागून राहू शकते की आपण या व्यक्तीला समजून घेण्यात चूक करत होतो का...? समोरच्याला जोखण्यात खरंच खूप घाई केली का...?
असा विचार जर प्रत्येकानं केला तर आयुष्य किती छान होईल, एखाद्या गाण्यासारखं! सुंदर, सुरेल, तालबद्ध, लयबद्ध, सुंदर शब्दांचं, मनोवेधक सुरावटींचं.....
-कायांप्रि
Comments
Post a Comment