भूतकाळ विसरून पुढे जाता यायला हवं. भूतकाळ
वाईटच असतो असं नाही. पण तो ‘भूत’काळ असतो. तो त्या भिंतीवर टांगलेल्या फोटोफ्रेमसारखा
असावा. म्हणजे येता-जाता आपण तिच्याकडे बघतो. फ्रेम नवीन असते तोपर्यंत आपण सतत
त्या फ्रेमकडे पहात असतो. मग हळूहळू ती फ्रेम त्या भिंतीचाच एक भाग होऊन जाते.
अविचल, निश्चल... बदलता न येणारी... पण नेहमी
तिथेच असणारी. घराची ती भिंत घराला आधार देते... ती फ्रेम आठवणींना... कधीतरी
निवांत क्षणी उगाच वाटून जातं की खूप दिवस झाले, त्या
फ्रेमवर खूप धूळ बसली आहे. साफ करायला हवी. मग ती फ्रेम साफ करता करता त्या
फ्रेमवरची धूळ उतरायला लागते आणि आठवणी उजळायला लागतात. त्या काचेवरची धूलिकणांची गर्दी
कमी होत जाते तशी मनात आठवणींची वर्दळ वाढायला लागते. फ्रेम स्वच्छ होते. एकदा
त्या फ्रेमकडे समाधानाने पाहिलं जातं. आता जणू ती फ्रेम जिवंत होऊन बोलायला
लागेल... पण असं काही होत नाही. ती पुन्हा त्या निश्चल भिंतीचा अविभाज्य भाग बनून
जाते.
भूतकाळाचंही असंच हवं. भूतकाळही अशी गोष्ट आहे
जी टाळता येत नाही, बदलता येत नाही, विसरताही येत नाहीच. पण विसरायचं कशाला? तो भूतकाळ
आपल्याला बरंच काही शिकवून जातो. काय करायला हवं हे सांगत नसला तरी काय करू नये हे
मात्र शिकवतो. अगदी आयुष्यभर लक्षात राहील अशी शिकवण देतो. मग भूतकाळ वाईट कसा?
-कायांप्रि
Comments
Post a Comment