आपल्या प्रत्येकाच्या मनाचे काही हळवे कोपरे
असतात. त्यांना हात घालायची परवानगी दुसर्यांनाच काय, स्वत:लाही नसते. आयुष्यात एखादाच नाजूक क्षण, अगदी निमिषार्धासाठी का होईना, येऊन जातो आणि मग तो
मनाच्या एखाद्या कोपर्यात खोल रुतून बसतो. हळूहळू त्याचा मग एक हळवा कोपरा होतो. ज्याचा
त्रास होतोही आणि नाहीही. ज्याच्या जाणिवेने चेहर्यावर स्मितहास्य फुलतं आणि
नाहीही. संदिग्ध भावना असतात. आपल्याला ती संदिग्धता उलगडावीशी वाटत नाही. त्याची
गरजही नाही. आयुष्याच्या कुठल्यातरी एका अनामिक क्षणी
आपल्याला ते अकस्मात गवसतात आणि आपण विस्मयचकित होऊन जातो.
या कोपर्यांतून आठवणींचा खजिना दडलेला असतो.
काळाच्या ओघात त्यातून कोणते रत्न हाती लागेल सांगता येत नाही. काळ बदलतो, वेळ बदलते, संदर्भ बदलतात, व्यक्ती आणि गोष्टीही बदलतात; पण ते कोपरे तसेच
राहतात.
हे कोपरे प्रत्येकाच्या मनात असतात. सगळ्यांनाच
ते जाणवतील असं नाही. पण ज्यांना हे कोपरे गवसले, ते खरंच भाग्यवान!
कधी एकांतात एकट्या क्षणी
अचानक हळवे झालात आणि त्यातून सावरायची ताकद असूनही सावरावंसं नाही वाटलं, तर तो कोपरा तुम्हाला गवसला असं
समजा!!
-कायांप्रि
Comments
Post a Comment