"कुणामुळे कुणाचं काही अडत नसतं गं आयुष्यात."
"त्याचीच तर भीती वाटते ना."
"म्हणजे?"
"आपण ज्या माणसासाठी आपलं आयुष्य वेचलं, ज्या माणसासाठी
जगलो, तो माणूस आपल्याशिवायसुद्धा जगू शकतो."
"हो, पण सुखात जगू शकतो असं नाहीये ना."
"पण मग तो ते जगताना आपल्याला विसरून जाईल याची बोच मनाला जास्त खात राहते."
"असं एखाद्याला
विसरणं सोपं असतं का?"
"अवघड पण नसतं ना रे."
"कुणी जाणून बुजून नसतं विसरत गं आपल्या माणसाला."
"पण गेलेला माणूस हळूहळू विस्मरणात जातो हेही तितकंच खरं आहे ना?"
"..."
"ऐक ना..."
"मरण नसतं आपल्या हातात. ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात, ज्या कंट्रोल करता येत नाहीत त्यांची भीती वाटणं साहजिक आहे. त्यामुळेच
हे सगळे विचार मनात यायला लागतात."
"भीती मरणाची नसते रे... ती विस्मरणाची
असते."
"..."
"आपल्या आवडीच्या माणसाच्या आयुष्यात आपण नाही, या गोष्टीचा त्रास होतोच. लोक आपल्याला विसरून जातील, याची भीती वाटते. जर आपल्या मरणानंतर आपण विस्मरणात
जाणार असू तर आपल्या इतक्या वर्षांच्या
आयुष्याला काही अर्थच नाहीये असं वाटायला लागतं आणि मग माणसांच्या
या अफाट पसाऱ्यात आपण किती एकटे आहोत याची भयावह जाणीव उरलेलं आयुष्य पोखरायला लागते."
"खूप विचार करतेयस तू या गोष्टींचा."
"मरण कुणालाच टळलेलं नाहीए. पण जितकी वर्षं जगलो ते फक्त आठवण बनून राहणार आणि काही वर्षांनी त्या आठवणीही विस्मरणात जाणार ही गोष्टच पटत नाही. अर्थ काय मग जगण्याचा आटापिटा करण्याचा?"
"मरणानंतर काय होतं यापेक्षा जगताना कसे जगलो हे जास्त महत्त्वाचं
नाहीए का?"
"पण मला तुला सोडून जायचं नाहीए. कधीच."
"तू चालली आहेस याचा अर्थ हा नाहीए की मी इथेच राहणार आहे. मीही येईनच की. फक्त कधी ते माहीत नाही."
"असं बोलू नको."
"कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही. कुणीही कधी अमर होऊ शकत नाही. मरण सुंदर आहे गं..."
"त्यात काय सुंदर आहे?"
"कारण ते जीवन संपवतं."
"तू..."
"बघ ना. वर्षानुवर्षं फक्त जगत रहायचं. किती बोरिंग आहे अगं!"
"ते आपण एक्सायटिंग बनवायचं असतं."
"आणि असं किती वर्षं करत राहायचं?"
"..."
"अगं आपण कधीतरी मरणार आहोत हे माहीत असतं म्हणूनच तर जगण्याची पुरेपूर मजा घेऊ शकतो आपण. आपलंच बघ ना. किती सुखाने आणि समाधानाने जगलो आपण. एकमेकांच्या
सहवासात. पुरेसं आहे ना हे."
"पण तो सहवास अजून काही वर्षं टिकला असता तर..."
"जितका सहवास लाभला त्याचं सुख सात जन्म पुरून उरेल. जे मिळत नाहीए त्याच्या दुःखापेक्षा
जे मिळालंय त्याचा आनंद जास्त आहे."
"कितीही मिळालं तरी कमीच वाटतं रे ते."
"पण मिळालं याचं समाधानही आहेच ना?"
.
.
.
.
.
"एक सांगू?"
"आता पुन्हा हट्ट करणार असलीस तर..."
"ऐकून तरी घे."
"..."
"ऐक ना."
"हं."
"माझ्या जाण्याच्या
विचारानं माझ्यापेक्षा तूच जास्त खचून गेलायस. मरण दारात उभं असताना खूप काही खास आठवणी देऊ शकत नाही मी तुला. म्हणून ही माझी शेवटची आठवण. लक्षात ठेव तू मला काय काय सांगितलंस
ते..."
"खरंच चाललीस का?"
"तू मला आठवणीत जपून ठेव असा हट्ट करणार नाही मी. तुझ्याबरोबर संसार करता आला आणि तो सुखाचा झाला याचा मला खरंच आनंद आहे. त्याहीपेक्षा या गोष्टीचा आनंद जास्त आहे की माझ्याबरोबर
तूही सुखात होतास. त्यामुळे आता माझ्या आठवणीत झुरत राहू नको आणि माझ्याकडे
यायची घाई पण करू नको. कळलं?"
"हम्म."
"ऐक ना."
"काय?"
"माझ्याकडे बघ ना रे एकदा."
"आणि काय करायचं—"
....................................................................................
- कायांप्रि
Comments
Post a Comment