काही भावना जशा शब्दांत व्यक्त करता येत नाहीत, तसंच प्रेमही आहे. असलेली, पण शब्दांत बांधता येत नसलेली भावना.
प्रेम. कुणाचंही कुणावरही असू शकतं. कुणाचंही कशावरही असू शकतं. व्यक्ती, वस्तू, स्वप्न, कल्पना, संकल्पना... कशावरही. सहसा आपण एखाद्या वस्तूवर, व्यक्तीवर प्रेम करतो म्हणजे काय करतो? Generally आपण एखाद्याची जेवढी काळजी करत असतो, जेवढा विचार करत असतो, जेवढा आदर करत असतो, त्यापेक्षा थोडा जास्त आपण आपल्या प्रेमाच्या माणसांबद्दल, वस्तूंबद्दल करतो.
जे दाखवता येतं, ते प्रेम का? जे व्यक्त करता येतं, ते प्रेम का? Love is a feeling which you have to feel…& it feels greattttttttttt! प्रेम ही अशी भावना आहे जी प्रेमापलीकडची आहे. अव्यक्त, अनाकलनीय, अपार, अभेद्य, मन व्यापून टाकणारी आणि तरीही तिच्या अस्तित्वाची जाणीव फार अंधुक असलेली. ती असते प्रत्येकाच्या मनात पण कळते फार थोड्यांना.
कधी कधी ती आपण डोक्यावर घातलेल्या हॅटसारखी असते. आपल्याला तिचं अस्तित्व फारसं जाणवतंच असं नाही तरीही ती आपल्याला उन्हाच्या तीव्र झळांपासून वाचवते. ती दुसऱ्यांना बऱ्याचदा दिसते म्हणजे आपल्यालाही दिसेल असं नाही. दुसऱ्यांच्या डोक्यावरची हॅट आपल्याला सहज दिसते पण आपल्या डोक्यावरची नाही. पण ही दुसऱ्याच्या डोक्यावरची हॅट बघायची दृष्टी कोण देतं आपल्याला? उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असतानाही भर उन्हात दुसऱ्याच्या डोक्यावरची हॅट कशी काय दिसते? आपल्या डोळ्यांमुळे? नाही. डोळे हे माध्यम आहेत, आपल्या डोक्यावरची हॅट आपल्या डोळ्यांचं रक्षण करते जेणेकरून आपण दुसऱ्यांना नीट उघड्या डोळ्यांनी बघू शकू. कधी कधी आपलं प्रेम जेव्हा आपण समोरच्याच्या डोळ्यांत परावर्तित, प्रतिबिंबीत झालेलं बघतो ना, त्यावेळी आपल्याला दिसते आपली हॅट. तिचं अस्तित्व आणि महत्त्व जाणवतं.
खरंतर आपण एखाद्यावर जेव्हा मनापासून प्रेम करतो तेव्हा आपण आपल्या नजरेने त्या व्यक्तीला बघत असतो. आपल्याला ती आयुष्यभर सोबत हवी असते. कारण आपल्याला वाटतं की आपण तिच्याबरोबर सुखी राहू शकतो आणि ती आपल्याबरोबर.
एकमेकांबरोबर राहिल्यानंच प्रेम सिद्ध होतं का? मुळात प्रेम ही सिद्ध करायची गोष्ट आहे का?
प्रेम ना सिद्धांत आहे, ना साध्य. मग काय आहे? संकल्पना की विश्वास? सत्य की आभास? उमलत जाणारी आणि तरीही कधीही न कोमेजणारी जाणीव आहे. त्याला काही मापदंड नाहीत तरीही ते वाढत गेल्याचं कळतं आपल्याला. त्याला ना रंग, ना रूप. तरीही ते सुंदर आहे. ते ना भाषिक आहे, ना कायिक. तरीही ते दोन मनांचा संवाद आहे आणि दोन आत्म्यांचं मिलनही. तो कुठलाही बदल नाही, तरीही माणसाला अंतर्बाह्य बदलण्याची ताकद आहे त्याच्यात. दृष्टीला दिसत नाही तरी दृष्टीकोन घडवायचं सामर्थ्य आहे. त्याला चव नाही; तरीही ते ओठांवर येतं तेव्हा वाणी गोड होऊन जाते. कानांना ऐकू येत नाही तरी त्याची धून अवघं आयुष्य नादमय करून जाते. कवेत घेता येत नाही तरीही दो करांनी उधळावंसं वाटतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. ते ज्याचं त्यानं आपल्या मनाप्रमाणं करायचं आणि समजून घ्यायचं असतं.
आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिने सुखी असावं, आनंदी रहावं. मग ती कुठेही, कुणाबरोबरही असू दे. तिनं आपल्याच बरोबर असावं आणि फक्त आपणच तिला सुखी ठेवू शकतो हा अट्टाहास आणि गैरसमज का? तेही एक प्रकारचं समर्पणच आहे ना. प्रेमात केलेलं समर्पण हे मनापासून आणि समाधानकारक, समाधानदायक असावं. ज्यात त्रास होतो ते प्रेम कसलं! आणि ज्याने त्रास होत नाही ते तरी प्रेम कसलं! दोन्ही त्रास वेगळे आहेत, अगदी त्रास असले तरीही. एकात पश्चाताप आहे, तर एकात समाधान. एक त्रास नकोसा, एक त्रास अगदी हवाहवासा. एकापासून पळून जावंसं वाटतं, एकाकडे पळत जावंसं वाटतं. प्रेम ही एक मजेशीर भावना आहे.
माणसागणिक प्रेमाचे संदर्भ आणि व्याख्या बदलतात, पण भावना तीच राहते.
-कायांप्रि
Comments
Post a Comment