पडली निसर्गा भूल तू
सृजनाची चाहूल तू
सत्य-असत्याची हूल तू
रांगडे कोमल तृणफूल तू
भक्तीचा या भक्त तू
लज्जेसवे आरक्त तू
विजनाहूनी विरक्त तू
जवळी तरी विभक्त तू
गुंत्यातही स्वमग्न तू
मूर्तीतूनी बघ भग्न तू
भास की आभास हा
स्वप्नास पडले स्वप्न तू
सृष्टीचे सामर्थ्य तू
धर्मात लपला स्वार्थ तू
अनाकलनाचा अर्थ तू
तुजविण परि व्यर्थ तू
जाणिवपूर्वक कृती तू
जाणिवेची गती तू
कुंठीत करीशी मती तू
गतीस पडली भीती तू
मुखवट्यामागचे सत्य तू
मुखोद्गत असे असत्य तू
खेळातील सातत्य तू
ना येशी तरी मग नित्य तू
पिल्लापरी स्वच्छंद तू
थेंबांसवे मग कुंद तू
गंधात या बघ धुंद तू
वार्यासवे बेधुंद तू
आभासाचा भास तू
सुटला नकळत श्वास तू
हवाहवासा त्रास तू
श्वासाहूनी उत्कट ध्यास तू
ज्योतीची या मग प्रीत तू
भ्रमरास सुचले गीत तू
अलौकिक दिवाभीत तू
पराजिताची जीत तू
मोहास होई मोह तू
मोहाचा खोल डोह तू
कामनेचा आरोह तू
अपेक्षाभंगाचा अवरोह तू
अपूर्णाचे पूर्णत्व तू
काट्याचे ममत्व तू
गहनाचे सत्व तू
मनाचे मम स्वत्व तू
शब्दांविणही व्यक्त तू
शब्दांसवे अव्यक्त तू
पर्याय ना तुजला कुणी
तूच तू अन् फक्त तू
-कायांप्रि
Comments
Post a Comment