उठायला उशीर
दुखरं अंग
सोफ्यावर लोळणार्या उश्या
बाकी काही नाही
अर्धवट झोप
पावाचे
दोन तुकडे
चुलीवरची
पिठलं-भाकरी
बाकी
काही नाही
चढायला लागलेला सूर्य
पळायला लागलेली वेळ
खुर्चीवर उताणं पडलेलं पुस्तक
बाकी काही नाही
धूळ,
धूर, फाटणारे कानांचे पडदे
माणसांची, गाड्यांची कचकच
फुटबॉल खेळणारी, सायकलवाली पोरं
बाकी काही नाही
तेच चेहरे, तोच आवार
तोच लॅपटॉप, तेच विचार
ड्रॉवरमध्ये पडलेलं पिक्चरचं
तिकीट
बाकी काही नाही
कॉफीचे कप,
कॅन्टीनचं जेवण
त्याच गप्पा, तेच विनोद
अचानक भरून आलेलं आभाळ
बाकी काही नाही
काम-तासाची झटापट
ओव्हरटाईम, बॉसची कटकट
पावसाच्या झडीत गाडी भजीची
बाकी काही नाही
पगाराची बेरीज
खर्चाची
वजाबाकी
हप्त्याच्या
गुणाकारासोबत कर्जाचा भागाकार
बाकी
काही नाही
तुडुंब रस्ते, वाहतुकीची कोंडी
दुसर्याच्या छत्रीचं गळणारं
पाणी
केसांतून टिपटिपणारे थेंब, चिंब मन
बाकी काही नाही
पुन्हा किल्ली नि तेच दार
घरातल्या कपड्यांवर आळस स्वार
वाहून गेलेला शीण
बाकी काही नाही
डोक्याची मंडई
किटलेले कान
मनाला स्पर्शून गेलेली झुळूक
बाकी काही नाही
रात्रीची निरव शांतता
विचारांचं मोहोळ
रातराणीचा दरवळ
बाकी... काही नाही
-कायांप्रि
Comments
Post a Comment