आ पल्याच विचारात त्या उतारावरून उतरत होते. उतार संपत आला. थोडंसं वळून गेल्यावर समोर मुख्य रस्ता आला. आणि मग आली समोर प्रचंड गर्दी. कोपर्यावर थांबून त्या गर्दीचे कुठूनही कसेही वाहणारे प्रवाह पहात होते. काय नव्हतं त्या गर्दीत ? गर्दीत गर्दी करणारे तरूण-तरूणींचे घोळके , खरेदीसाठी बाहेर पडलेले लोक , कानात headphones घालूनसुद्धा अगदी रस्त्यापलीकडे ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात “ traffic में फँस गया हूँ सर... ” म्हणत mobile shop समोर नवीन model (mobile चं!) बघत घुटमळणारे , गर्दीत एकांत शोधणारे , “ कित्ती गर्दी आहे! ” ची तक्रार करत आपल्या अजस्र देह आणि लवाजम्यासहीत गर्दीत घुसणारे , गर्दीत हिरवळ शोधणारे , गर्दीत हिरवळ असणार्या , class ला वेळ आहे म्हणत timepass करत फिरणारे , कुणी गर्दीत असूनही एकटे , कुणी एकटे असूनही ‘ एकटे ’ नसणारे... कितीतरी जण. अशा या गर्दीत आपण नक्की कोणत्या भूमिकेनं शिरावं असा विचार पडला होता मला. डोळे बंद केले. बंद डोळ्यांनाही ठसठशीतपणे जाणवावं असं अस्तित्व होतं त्या गर्दीचं. कानांत असंख्य गलके ऐकू येत होते... डोळे उघडले. तीच गर्दी. चेहरे बदलत असले तरी...
Writings by ©Kayanpri