तू येणार म्हटलं की सगळ्यात आधी तो मातीचा
सुगंध दरवळायला लागतो आसमंतात. मग बाहेर वाढणारा वार्याचा जोर लक्ष वेधून घ्यायला
लागतो. आकाशाकडे लक्ष जातं आणि त्या काळ्या ढगांचं आक्रमण डोळ्याला सुखावून जातं. अलगद
पावलं गॅलरीकडे वळतात. तुझ्या त्या बरसणार्या सरी नजर खिळवून ठेवतात. सरीवर सर...
सरीवर सर... तुझं ते बरसणं, का कुणास ठाऊक, फक्त नजरेसमोर नसतं. तू हळूहळू शरीरात बरसायला लागतोस. तुझ्या सरींचा
पडदा सगळा नजारा झाकून टाकतो. तरीही तुझा राग येत नाही. बरं वाटतं. कारण आता फक्त ‘तू’ दिसत असतोस. हवेतला वाढत
जाणारा गारवा मनापर्यंत जाऊन पोहोचतो आणि तू अजून जवळ येतोस. तुझ्यावर पटकन
काहीतरी लिहावंसं वाटतं म्हणून पेन हातात घेते. पण मग तो पेन हातातल्या हातातच
फिरत राहतो. तुझ्या सहवासाचा वाटेकरी सहन होत नाही बहुतेक! तुझा जोर वाढत जातो आणि
तुझं असणं फक्त जाणवत राहतं. कारण डोळे कधीच तुझ्या त्या पांढर्या पडद्यावर खिळून
गेलेले असतात आणि मन आसमंतात भ्रमण करायला बाहेर पडलेलं असतं. हो, पण या आसमंताला काळ-वेळेचं भान नसतं बरं का! या आसमंतात भूत
आणि वर्तमान एकत्र नांदतात... अगदी भविष्यसुद्धा! कुठल्याही
मितीपलीकडचा आसमंत...
तुझा गारवा आतपर्यंत शिरत जातो शरीरात...
हवाहवासा वाटतो. अचानक वाफाळलेला चहा हातात येतो आणि मन दुप्पट वेगानं हुंदडत
राहतं. मध्येच वीज चमकते... लख्खकन! प्रत्येक विजेबरोबर मन नव्या विचारांवर उडी
घेत राहतं. मला भिजायची हौस नाहीये,
पण तुला बघत उभं राहणं हा नेहमीचाच एक विरंगुळा आहे माझ्यासाठी. तुझा जोर कमी होत
जातो तसं मन, शरीर भानावर यायला लागतं. पण आता खूप हलकं
वाटायला लागतं... मग लक्षात येतं की आपल्याला काहीतरी लिहायचं होतं.
प्रयत्न करते लिहिण्याचा, पण नाही जमत. तुला शब्दांत बांधणं अवघड आहे. तू खूप अनिर्बंध
आहेस... स्वैर, मुक्त, मनस्वी, हट्टी... कितीही प्रयत्न केला तरी तुझ्यावर लिहिताना शब्द आधीच तुझ्यात
विरघळलेले असतात. तुला शब्दांत बांधण्याचा फोलपणा लक्षात यायला लागतो आणि मग तुझं
अफाट असणं पुन्हा जाणवत राहतं.
तुझ्यात प्रत्यक्ष न भिजूनही तुझं न्हाऊ घालणं
हवंहवंसं वाटत राहतं. तुला खूप बांधायचा प्रयत्न करते मी... शब्दांत, नजरेत, आठवणींत,
शरीरात... पण तू फार चलाख आहेस. जवळ येता येता हुलकावणी देऊन अगदी बघता बघता
नजरेसमोरून पसार होतोस. तुला बांधण्याची इच्छा अजून बळावत जाते. मीही तितकीच हट्टी
आहे म्हटलं! पण तुझं हे मनस्वी असणंच जास्त आकर्षित करतं मला...
शेवटी तुला बांधून घालायचे सगळे प्रयत्न
संपतात आणि मग तुला स्पर्शाने अनुभवायचा खेळ सुरू होतो. पेन बंद करायचं, डोळे बंद करायचे आणि अंधारात तुझा आवाज आणि तो गारवा अनुभवत
राहायचं.......... एक सुखद अनुभव!
तुझी ती धुंदी हळूहळू नशा बनत जाते....................
-कायांप्रि
Comments
Post a Comment