Skip to main content

Posts

Showing posts from June, 2018

पाऊस

तू येणार म्हटलं की सगळ्यात आधी तो मातीचा सुगंध दरवळायला लागतो आसमंतात. मग बाहेर वाढणारा वार्‍याचा जोर लक्ष वेधून घ्यायला लागतो. आकाशाकडे लक्ष जातं आणि त्या काळ्या ढगांचं आक्रमण डोळ्याला सुखावून जातं. अलगद पावलं गॅलरीकडे वळतात. तुझ्या त्या बरसणार्‍या सरी नजर खिळवून ठेवतात. सरीवर सर... सरीवर सर... तुझं ते बरसणं , का कुणास ठाऊक , फक्त नजरेसमोर नसतं. तू हळूहळू शरीरात बरसायला लागतोस. तुझ्या सरींचा पडदा सगळा नजारा झाकून टाकतो. तरीही तुझा राग येत नाही. बरं वाटतं. कारण आता फक्त ‘ तू ’ दिसत असतोस. हवेतला वाढत जाणारा गारवा मनापर्यंत जाऊन पोहोचतो आणि तू अजून जवळ येतोस. तुझ्यावर पटकन काहीतरी लिहावंसं वाटतं म्हणून पेन हातात घेते. पण मग तो पेन हातातल्या हातातच फिरत राहतो. तुझ्या सहवासाचा वाटेकरी सहन होत नाही बहुतेक! तुझा जोर वाढत जातो आणि तुझं असणं फक्त जाणवत राहतं. कारण डोळे कधीच तुझ्या त्या पांढर्‍या पडद्यावर खिळून गेलेले असतात आणि मन आसमंतात भ्रमण करायला बाहेर पडलेलं असतं. हो , पण या आसमंताला काळ-वेळेचं भान नसतं बरं का! या आसमंतात भूत आणि वर्तमान एकत्र नांदतात . .. अगदी भविष्यसुद्धा! कुठल्